एक रानडुक्कर आणि एक गाढव यांची एके दिवशी बरीच बोलाचाली झाली. वाढता वाढता ते भांडण हातघाईवर आले. आपणास सुळे असून, आपले डोके गाढवाच्या डोक्यापेक्षां मोठे आहे, तेव्हा गाढवास आपण सहज चीत करू अशा समजुतीने डुक्कर गाढवावर चालून गेला. इतका वेळ गाढवाचे तोंड डुकराकडे होते, पण डुकराच्या तिखट सुळ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही, असे पाहून गाढवाने आपले ढुंगण डुकराकडे केले व त्याच्या तोंडावर लाथा मारण्याचा सपाटा चालविला. डुकराची अगदी गाळण उडाली! त्यावेळी तो गाढवास म्हणतो, ‘अरे, हे काही धर्मयुद्ध नव्हे. टक्कर दयावयाची सोडून तू लाथा मारशील अशी मला कल्पनाही नव्हती!’
तात्पर्य :- स्वतःच्या सामर्थ्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास ठेवणे बरे नव्हे.